Monday 14 April 2014

सोन्याहून पिवळा "यलो"

(सदर लेख हा ऑनलाईन टाईप केल्यानं व्याकरणात झालेल्या चुकांबद्दल माफी असावी)

"The mind is everything. You are what you think"  हा भगवान गौतम बुद्धांचा विचार ,गौरी गाडगीळने प्रत्येकाच्या मनावर ठसवला आहे. यलो हा चित्रपट प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊनच पहिला पाहिजे. अतिशय वेगळा विषय घेऊन, त्याची अतिशय सुबक मांडणी केली आहे. प्रत्येक सीन अगदी सुंदर झाला आहे. गौरी, तिच्या  पाठीशी उभी राहणारी तिची आई, सतत प्रोत्साहन देणारा तिचा  मामा,  तिच्यावर मेहनत घेऊन तिला घडवणारे तिचे सर या चौघांनी मिळून गौरीला तिच्या पायावर उभ करण्याचा केलेला प्रयत्न हृदयाला स्पर्श करून जातो. चित्रपट हा चित्रपट न राहता त्या पलीकडे मनात घर करून जातो. कुठेही चित्रपट फिल्मी होत नाही. गौरीची गोष्ट आपल्याला खूप काही शिकवून जाते. "केल्याने  होत आहे रे आधी केलेची पाहिजे ",  "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल हि गळे ", "प्रयत्नाती परमेश्वर"  अश्या सगळ्याच सुविचारांचा खरा अर्थ गौरीची गोष्ट आपल्याला पटवून देते. आपल्याला विचार करायला भाग पाडते. जस आगीतून काढल्यानंतर सोन अधिक शुद्ध होत , जास्त चकाकत. अगदी तसच गौरीही तिच्या कष्टाने , जिद्दीने  "यलो" झाली आहे . गौरीच हे आत्मविश्वासच आणि जिद्दीच सोनेरी स्वप्न पाहण्यासाठी एकदा यलो आवर्जून बघा. महेश लिमये यांचे या अतिशय उत्कृष्ठ चित्रपटाबद्दल हार्दिक अभिनंदन. मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, गौरी गाडगीळ, रिशिकेश जोशी ,मनोज  जोशी, ऐश्वर्या नारकर या सगळ्यांचाच अभिनय उत्तम झाला आहे.त्यांचे  टीम वर्क त्यांच्या या अप्रतिम कलाकृतीतून दिसूनच येते. टीम यलोचे हार्दिक अभिनंदन !

गौरी गाडगीळ हिचे अभिनंदन , आम्हा सगळ्यांना तुझ्या जिद्दीने प्रेरणा दिल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !!!


कळावे ,
लोभ असावा .
 
आपली ,
मयुरा  डोळस.

Sunday 12 January 2014

TIMEPASS....

(सदर लेख हा ऑनलाईन टाईप केल्यानं व्याकरणात झालेल्या चुकांबद्दल माफी असावी)

"लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया … " या ओळी मराठी कलाकारांनी अगदी सार्थ ठरविल्या आहेत. खरोखरच अगदी एकाहून एक सरस कलाकृती मराठी सिनेसृष्टी आपल्या समोर घेऊन येत आहे. ३ जानेवारीपासून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या "टाईमपास" ने नवीन वर्षाची एक रोमांटिक सुरुवात केली आहे. पहिल्या ७ दिवसांतच १३. ५ करोडपेक्षा जास्त व्यवसाय करून "मराठी पाऊल पडते पुढे… " या उक्तीची आठवण करून दिली आहे. या चित्रपटाच्या या अलौकिक यशाबद्दल मला खूप खूप आणि अगदी मनापासून खूपच आनंद झाला आहे आणि अभिमानही वाटतो आहे.

रवी जाधव यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने दगडू आणि प्राजक्ता यांच्या सुंदरश्या प्रेमकथेच अत्यंत उत्तम चित्रीकरण झालं आहे. चित्रपट कुठेही न रेंगाळता अत्यंत नेमकेपणाने मांडला आहे. रवी जाधव आणि प्रियदर्शनचे संवाद मात्र चित्रपटाआधी प्रोमोमधूनच लक्षात राहतात इतके झकास.!  केतकी आणि प्रथमेशचा छान अभिनय झाला आहे. दगडूची भूमिका आणि संवादाची शैली मात्र चित्रपटात खूपच मजा आणते आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवते. मेघना एरंडे आणि वैभव मांगले नेहमीप्रमाणेच अगदी उत्तम . भूषण प्रधान आणि उर्मिला कानिटकर यांचा अभिनय छानच झाला आहे . उर्मिला छोट्याश्या भूमिकेतही लक्ष वेधून घेते . प्रथमेश परबने रंगविलेला दगडू मात्र "फुल टू सुपरहिट."

गुरु ठाकूर यांना सुचणाऱ्या काव्याचा संपूर्ण प्रेक्षकवर्गच खुळा आहे . त्यांची गीते प्रदर्शित झाली की लगेचच सगळ्यांच्या मोबाईलमध्ये येतात . "मला वेड लागले .." हे स्वप्नील आणि केतकीच्या आवाजातील गाणे सगळ्यांच्याच ओठांवर राहिले आहे . चित्रपटातील इतरही सगळीच गाणी छानचं झाली आहेत. "हि पोळी साजूक तुपातली " ने  तर सगळ्यांनाच धमाल आणली आहे .

टाईमपासच्या या यशाबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन  आणि मनपुर्वक शुभेच्छा!!! . एका नव्या कलाकृतीसोबत किंवा टाईमपासच्या पुढच्या भागासोबत २०१५ चीही अशीच जल्लोषपूर्ण सुरुवात पाहण्यासाठी संपूर्ण प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहत आहे..


अरे आमचा चित्रपट मराठी असला म्हणून काय झाले?
तो बॉलीवूड आणि हॉलीवूडला पण तुफान टक्कर देतो …
आम्ही कालही दर्जेदार चित्रपट बनवत होतो…
आजही दर्जेदार चित्रपट  बनवतोय ..
आणि उद्याही दर्जेदार चित्रपट  बनवत राहणार …
चला AWARD येऊ द्या   ….



कळावे ,
लोभ असावा .
 
आपली ,
मयुरा  डोळस.

Sunday 29 December 2013

अलविदा २०१३

(सदर लेख हा ऑनलाईन टाईप केल्यानं व्याकरणात झालेल्या चुकांबद्दल माफी असावी)
 
"लाईट, साऊंड, कॅमेरा, एक्शनतिसरी घंटा…" हे शब्द कितीही आवडीचे जरी असले, तरी त्यांच्याशी संबंधित गोष्टींमध्ये काम करण्याचा सुयोग कधी शाळा, कॉलेज नंतर आला नाही. म्हणून ठरवलं, नवीन वर्षी नवा संकल्प करूयात. आपल्याला आवडलेल्या प्रत्येक कलाकृतीचं समीक्षण आपल्या शब्दात मांडूयात. मनात विचार आला चांगल्या कामासाठी नवीन वर्षाची वाट कशाला पहायची? "शुभस्य शीघ्रम"…  म्हणूनच २०१३ मधील मराठी चित्रपटसृष्टीवर टाकलेल्या नजरेची एक छोटीशी झलक खास तुमच्यासाठी

ओपनिंगला सचिनने येऊन पहिल्याच बॉलला सिक्सर मारावा अगदी तसंच २०१३ च्या पहिल्याच आठवड्यात रवी जाधव यांच्या "बालक पालक" ने जोरदार सुरुवात केली. अत्यंत नाजूक विषयाची मुद्देसूद आणि समर्पक मांडणी करण्यात रवी जाधव यांना चांगलं यश मिळालं आणि पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या कथांमधील वैविध्य सादर झालं. यावर्षी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. सतीश राजवाडे यांचा "प्रेमाची गोष्ट" सुपरहिट ठरला. त्याच कथेमध्ये तीच कथा मांडण्याचं लेखकाचं कौशल्य मनाला भावलं. अतुल कुलकर्णीसोबत सागरिका घाटगेचं मराठीत यशस्वी पदार्पण झालं. बेला शेंडेच्या आवाजातील "ओल्या सांजवेळी…" हे गाणं अगदी सहजच सगळ्यांच्या ओठावर राहिलं. तसेच "जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा" मधील गाणी छान चालली. या वर्षी पुन्हा एकदा सचिन खेडेकरसोबत चंद्रकांत कुलकर्णी यांचा "आजचा दिवस माझा" हा चित्रपट विशेष ठरला. त्यात महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर यांचा अभिनय अतिशय उत्तम झाला आहे. दरम्यानच्या काळात मात्र "टुरिंग टॉकीज", "पुणे ५२", "संशयकल्लोळ", "खो खो", "झपाटलेला ", हे चित्रपट पहायचे राहून गेले. पण तरीही एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, कि गजेंद्र अहिरे आणि सुबोध भावे यांच्या "टुरिंग टॉकीज" ने देशविदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे स्थान मिळवले.  

१९ जुलैला रिलीज झालेल्या संजय जाधव यांचा "दुनियादारी" हा विशेष उल्लेखनीय यश मिळवून मराठी चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड ठरला. सुहास शिरवळकरांची  उत्कृष्ट कथा, सगळ्यांच्या तोंडात राहिलेले असे उत्तम संवाद आणि यासोबत अत्यंत श्रवणीय असं सुपरडुपरहिट संगीत या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या. त्याच दरम्यान "चेन्नई एक्स्प्रेस" चित्रपटगृहात चालू असतानाही दुनियादारी नेहमीच हाऊसफुल राहिला याचा मला एक अस्सल मराठी प्रेक्षक म्हणून सार्थ अभिमान वाटतो. चेनई एक्स्प्रेसच्या २०० करोडच्या व्याप्तीपेक्षा दुनियादारी प्रेक्षकांच्या पसंतीने यशस्वी झाला हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. शाहरुख खानला तुफान टक्कर देऊन स्वप्निल जोशी आणि अंकुश चौधरी हिट ठरले.
 
 

 

"नवा गडी नवं राज्य" या नाटकावर प्रदर्शित झालेला प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा  "टाईमप्लीज" ही छान चालला. उमेश कामत यांची मोठी चाहती असूनही एक प्रेक्षक आणि एक मराठीची चाहती म्हणून माझं एक प्रामाणिक मत असं की ,या चित्रपटामध्ये नाटका इतकी मजा आली नाही. हे नाटक म्हणूनच मला खूप आवडलं .ते मी प्रत्येकवेळी पाहिल्यानंतर तिथे कितीही गर्दी असली तरी नाटक छान झालं असा अभिप्राय द्यायला मात्र विसरले नाही
 
 
 

"श्रीमंत दामोदर पंत" या नाटकावरील केदार शिंदे यांचा चित्रपटही उत्तम चालला. पण माझ्या मते हा चित्रपट वेगळ्या कालावधीत प्रदर्शित झाला असता तर भरत जाधव यांच्या अभिनयाचे वेगवेगळे रंग पाहण्यासाठी आत्तापेक्षाही जास्त गर्दी झाली असती. दरम्यान खंत याची की सतीश राजवाडे यांचा "पोपट" आणि राजीव पाटील यांचा " ७२ मैल - एक प्रवास" मात्र अजून पहिला नाही .
आदित्य सरपोतदारांचा "नारबाची वाडी" हा खूपच सुंदर आणि हलकाफुलका विषय मांडणारा उलेखनीय चित्रपट ठरला. दिलीप प्रभावळकर यांच्या अप्रतिम अभिनयाचं दर्शन देणारा आणि आनंद देणारा हा चित्रपट मला खूपच आवडला . अगदी साधासा आणि छोटासा विषय , त्यातून आकर्षकरीत्या कथेची मांडणी करून मनोरंजक पद्धतीने जगण्यासाठी एक साधी छोटीशी शिकवण देतो. अजय नाईक यांचा "लग्न पहावे करून" हा मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या सोबतचा चित्रपटही उत्तम चालला ,परंतु माझ्या मते चित्रपटगृहातून बाहेर पडताना पत्रिका वगैरे बघणे यामध्ये फारसं तथ्य नसतं  किंवा ते पाहिलेलंच चांगलं असत , असा  दोन्हीपैकी कोणताही एक संदेश ठाम प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यास चित्रपट थोडा अयशस्वी ठरतो.  

स्वप्नील आणि मुक्ताची जोडी पुन्हा एकदा "मंगलाष्टक " मुळे वन्स मोअर ठरली. चित्रपटाच्या सुरुवातीला "दिवस ओल्या " हे गाणं black &white  फोटोंमध्ये चित्रित करण्याची संकल्पना सुंदर होती. मुक्ता बर्वेच्या अभिनयाचा मात्र एक वेगळाच रंग या चित्रपटामुळे पहावयास मिळाला. "सर सुखाची ." हे गुरु ठाकूर यांनी लिहिलेले गीत म्हणजे एका उत्तम कम्पोझिशनची प्रेक्षकांना भेटच आहे. "तेंडूलकर आउट " या सस्पेन्स चित्रपटाने सचिन तेंडूलकरच्या शेवटच्या कसोटीचा मुहूर्त साधून उत्तम यश मिळवले. सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित "पितृऋण" च्या निमित्ताने एक वेगळीच कथा आपल्या सचिन खेडेकर आणि तनुजा यांच्यासोबत पाहायला मिळाली 

छोट्या पडद्यावर एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली. उमेश कामत आणि स्पृहा जोशीचा अप्रतिम अभिनय , रंजित  आणि मोहन जोशी यांची  धमाल कॉमेडी ,चिन्मय मांडलेकरच सुंदर  हलकफुलक लेखन याने सगळ्यांनाच वेड लावलं. 
 

हे वर्ष स्वप्नील जोशीसाठी फारच लकी ठरले. चित्रपटासोबतच  त्याच्या "गेट वेल सून " या नाटकालाही प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. मुक्ता बर्वेच्या "छापा काटा " या नाटकाचा सुंदर शुभारंभ झाला 

यावर्षी मी सगळ्यात जास्त पाहिलेलं channel म्हणजे  "x झकास ".  खरच "x झकास "मुळे  मराठी गाणी खऱ्या अर्थाने प्रेक्षकापर्यंत पोहोचली . मराठी प्रेक्षकवर्ग मराठी सिनेमाच्या जवळ आला 

यंदा  सचिन पिळगावकर यांच्या  ५० वर्षांच्या कारकिर्दी निमित्त  झालेला  "सुवर्ण सचिन"  हा सोहळा लक्षवेधी ठरला. नुकतेच  "हाच माझा मार्ग" हे पुस्तक वाचून काढले. सचिन यांनी अतिशय प्रामाणिकपणे यात आपल्या आठवणी मांडल्या आहेत 

एकंदरीत २०१३ हे मराठी सिनेसृष्टीला भाग्यकारक आणि मराठी सिनेमाची प्रतिमा उंचावणारे ठरले. परंतु याच वर्षी सिनेसृष्टील काही तारे निखळले . सगळ्यांना नेहमी हसवणारे सतीश तारे ,उत्तम अभिनय आणि भारदस्त आवाज असणारे विनय आपटे,   तसेच आनंद अभ्यंकर ,अक्षय पेंडसे ,दिग्दर्शक राजीव पाटील ,निर्माते सुधीर भट हे आपल्याला सोडून गेले . पण ते नेहमीच  त्यांच्या कलाकृतींतून आपल्या सोबत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 

हि होती एक झलक २०१३ची ,पुन्हा नवीन वर्षी एक अस्सल मराठी प्रेक्षक आणि मराठीची चाहती म्हणून मी नव्या कलाकृतींबद्दल माझी मते मांडत राहीन . आता २०१४ मध्ये येणारा रवी जाधव यांचा चित्रपट हा "टाईमपास " जरी असला ,तरी त्याच्या कडून खूप अपेक्षा आहेत.  

असो . सदर लेखातून कोणाचीही मने दुखावण्याचा माझा हेतू नव्हता ,तरीही कळत नकळत कोणी दुखावले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करते. तसदीबद्दल क्षमस्व.  

नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

कळावे ,
लोभ असावा .

आपली ,
मयुरा  डोळस.